डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन येथे स्थापलेल्या महाराष्ट्र मंडळाचा उपक्रम | लंडन च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण
Marathi Alphabet म (ma) |
गुजराती व पंजाबी पाठोपाठ लंडनमधील मराठी वा अमराठी विद्यार्थी ही शिकणार मराठी भाषा
राज्य सरकार लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने लंडनमधील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. सरकारने अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी 'राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या' (SCERT) संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.
महाराष्ट्र सरकार चा शासकीय ठराव
SCERT आणि महाराष्ट्र मंडळ, लंडन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाषा अभ्यासक्रम म्हणून मराठीचा अभ्यास करता येणार आहे. या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने 10 जुलै रोजी अधिकृत सरकारी ठराव (GR) जारी केला.
महाराष्ट्र राज्याच्या शासकीय ठरावा नुसार
- सरकारने नियुक्त केलेली समिती लंडनमधील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाला अंतिम रूप देईल.
- लंडनमधील इयत्ता 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांसाठी सुलभतेच्या दृष्टीने प्रशिक्षणात महाराष्ट्र मंडळ 20% ने बदल करेल.
- महाराष्ट्र मंडळासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याबरोबरच राज्य सरकार परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देईल
- लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या पाच सदस्यांसह 10 सदस्यीय समिती लवकरच अंमलबजावणी धोरणाला अंतिम स्वरूप देईल आणि लंडनमधील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सामंजस्य कराराची अंमलबजावणी करेल.
लंडन मधील सर्वात जुने महाराष्ट्र मंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर व N C केळकरांनी स्थापले |सध्याचे अध्यक्ष वृषाल खांडके
लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके म्हणाले, “सध्या लंडनमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील मराठी लोक राहतात. त्यांना आपल्या संस्कृतीशी आणि भाषेशी जोडण्यासाठी आम्ही नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो, पण या प्रयत्नांना औपचारिकता देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्याच्या सहकार्याने हे संस्कृती संवर्धन कार्य पुढे नेण्याचे ठरविले आहे.
लंडनमधील हे सर्वात जुने महाराष्ट्र मंडळ आहे, ज्याची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अभ्यासक एन.सी. केळकर यांनी 1932 मध्ये लंडनमध्ये असताना केली होती.
महाराष्ट्र मंडळाचे धोरण
“लंडन मधे गेल्या आठ-नऊ दशकांपासून आपण आपल्या पिढ्यांमध्ये विविध उपक्रमांद्वारे मराठी मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आता आम्ही या उपक्रमाला एक औपचारिक रूप देत आहोत. UK मध्ये, विद्यापीठ प्रवेशासाठी यूसीएएस( UCAS) गुणांचा विचार केला जातो. मराठी शिकल्याने विद्यार्थ्यांना हे गुण मिळण्यास मदत होईल,” असे खांडके म्हणाले.
UCAS : UK मधे भाषा कौशल्या साठी विशेष गुण
UK शिक्षण प्रणाली अंतर्गत, जे विद्यार्थी इंग्रजी व्यतिरिक्त इतर कुठलीही भाषा आत्मसात करतात ते UCAS गुण मिळवू शकतात, जे पुढे विद्यापीठ प्रवेशादरम्यान विचारात घेतले जातात. खांडके म्हणाले की, सध्या लंडनमध्ये इतर परदेशी भाषांव्यतिरिक्त गुजराती आणि पंजाबी भाषा उपलब्ध आहेत. आमच्या या उपक्रमामुळे मराठी भाषेचे प्रशिक्षणही सुरू होणार आहे
“तसे हे प्रशिक्षण केवळ मराठी विद्यार्थ्यांसाठी सीमित नाही. सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यासाठी व व्यक्तीसाठी हे खुले आहे,” खांडके म्हणाले.
0 टिप्पण्या