Great Maratha महादजी शिंदे यांचे जन्मस्थान कोणते?
![]() |
महादजी शिंदे यांचे तैलचित्र व महाराष्ट्र नकाशातील त्यांचे जन्मगाव श्रीगोंदा |
महादजी शिंदे नगरच्या श्रीगोंद्याचे की जामगावचे की सातारच्या कण्हेर खेड गाव चे?
' The Great Maratha' असा खुद्द ब्रिटिशांनी उल्लेख केलेले शूर मराठा सरदार महादजी शिंदे हे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे गावचे की सातारच्या कण्हेर खेड या गावचे असा एक वाद चर्चिला जातो . कण्हेर खेड हे महादजींच्या वाडवडीलांचे गाव पण जामगाव चा भव्य भुईकोट किल्ला त्यांच्या वास्तव्याचे प्रमाण देतो आणि जन्म या निकषावर महादजी शिंदे हे श्रीगोंद्याचेच असे म्हणावे लागते.
महादजी शिंदे आणि श्रीगोंदा
महादजी शिंदे यांचा जन्म नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथला असे श्रीगोंदा वासी सांगतात. पुढे महादजी आपल्या थोरल्या बंधूंच्या जामगाव किल्ल्यावर राहू लागले. हा विशाल किल्ला अहिल्याबाई नगर च्या पारनेर तालुक्यातील आहे.
सुरूवातीपासूनच महादजींचा ओढा जन्मगाव श्रीगोंद्याकडे होता जिथे त्यांचे थोरले बंधू यांची पाटिल की होती .महादजी शिंदे सातत्याने पारनेर तालुक्यातील जामगाव हून ६०-७० किलोमीटर अंतरावरील श्रीगोंदे गावी येत असत मात्र सातारच्या कण्हेरखेड या वाडवडीलांच्या गावी ते फक्त दोनदा गेल्याचे उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर म्हणता येते असे इतिहास तज्ञ सांगतात.
महादजींना पाटिलबुवा असे ही संबोधले जाई यावरून ते श्रीगोंद्याच्या पाटलांचे किंवा पाटिलकीचे वारस अशीही त्यांची ओळख असावी.
श्रीगोंदा हे नामकरण ब्रिटिशांनी केले
श्रीगोंदा गावाचे मूळ नाव शिरपूर असे होते त्याचबरोबर प्रसिद्ध संत गोविंद चांभार यांच्या वास्तव्यामुळे या गावास 'चांभार गोंदा' असे ही म्हटले जायी. ब्रिटिश आमदनी मधे या दोन्ही नावांचे मिश्रण करून श्रीगोंदा अशी गावाच्या नावाची नोंद सरकार दप्तरी झाली.श्रीगोंद्याचा पूर्व इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा अर्थात वेरूळ चे मालोजीराजे जे अहमदनगर सलतनत चे सरदार होते , त्यांनी आपले आध्यात्मिक गुरू शेख मोहम्मद महाराज यांना श्रीगोंदा येथे आणून त्यांच्यासाठी येथे मठ बांधला. मालोजींचे पुत्र व शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी ही येथे राज्य केले.
जामगाव,पारनेर भुईकोट किल्ला
महादजी शिंदे यांचे सख्खे थोरले बंधू तुकोजीराव श्रीगोंदा इथून राज्य करत होते.बालपणीच्या श्रीगोंदा येथील काही काळच्या वास्तव्या नंतर महादजी शिंदे जामगावच्या भव्य भुईकोट किल्ल्यात आपल्या थोरल्या सख्ख्या भावाकडे राहू लागले.
नगर कल्याण हायवेवरील बाळवली गावापासून चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे . किल्ल्याचा अंतर्गत परिसर तब्बल ८६ एकर विस्तीर्ण पसरलेला आहे. या भक्कम किल्ल्याला दुहेरी बांधकाम केलेली दगडी तटबंदी आहे .
जामगाव भुईकोट किल्ला location
![]() |
जामगाव चा भुईकोट किल्ला |
श्रीगोंद्या पासून हा किल्ला ७० किमी अंतरावर आहे.
अहमद नगर पासून २५ किलोमीटरवर व
पारनेर पासून १४ किलोमीटर वर हा किल्ला आहे
![]() |
जामगाव किल्ल्यातील मुख्य वाड्याचे प्रवेशद्वार |
![]() |
जामगाव किल्ल्याचा आतील भाग |
जामगावचा किल्ला हा तुकोजीराव शिंदे या महादजींचे सख्खे थोरले बंधू यांचा गड. तुकोजीराव शिंदे पुढे १७६१ साली पानीपत युद्धात कामी आले. त्यांच्या पश्च्यात महादजींनी राज्यकारभाराची धुरा सांभाळली. इथूनच महादजींच्या झंजावाती कारकिर्दीची सुरूवात झाली.
सातारचे कण्हेर खेड हे महादजींच्या वडीलांचे गाव
कण्हेर खेड चे राणोजी शिंदे हे महादजी शिंदेंचे वडील व शिंदे राजवटीचे मूळ संस्थापक
राणोजी शिंदे(१७००-१७४५) यांचा जन्म सातारच्या कण्हेर खेड चा. कण्हेर खेड ची पाटीलकी त्यांच्याकडे होती.
१७३१-१७४५ या काळात त्यांनी शिंदे राजवट चालविली. पेशवाई तील ते मोठे सरदार होते.
वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाले
चिमाजी अप्पा यांच्या बरोबर वसई च्या युद्धात त्यांनी पोर्तुगीजां विरुद्ध मर्दुमकी गाजविली होती.
राणोजींच्या दोन पत्नी होत्या : मैनाबाई व चिमाबाई
राणोजी नंतर सातारच्या कण्हेरखेड ची पाटिल की त्यांच्या पुत्रांकडे आली आली . राणोजींना आपली पहिली पत्नी मैनाबाई पासून तीन पुत्र झाले त्यातील जयाप्पाजी शिंदे हे थोरले, दत्ताजीराव दुसरे व ज्योतीबा राव शिंदे हे तिसरे पुत्र.
राणोजींची दुसरी पत्नी चिमाबाई हिच्यापासून झालेले दोन पुत्र म्हणजे तुकोजीराव शिंदे व महादजी शिंदे
महादजी हे राणोजींचे सर्वात लहान पाचवे पुत्र
महादजीं चे ३ सावत्र व एक सख्खा असे चार थोरले भाऊ
महादजी शिंदे व त्यांचे चार थोरले भाऊ मिळून राणोजी शिंदे यांचे पाच पुत्र होते
१) जयाप्पाजी राव , थोरले सावत्र भाऊ ( १७२०-१७५५) आई मैनाबाई
२) दत्ताजी राव शिंदे ,महादजींचे पराक्रमी सावत्र भाऊ(१७२३- १० जानेवारी १७६०)
दत्ताजी सातारच्या कन्हेरगाव चे पाटिल होते- आई मैनाबाई
नानासाहेब पेशव्यांनी उत्तरेकडे अहमदशहा अब्दाली चे अफगाणिस्तान कडून आलेले आक्रमण रोखण्यासाठी त्यांना पाठवले. दत्ताजींनी अटकेपार मराठेशाही चा झेंडा फडकवला. ७०० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात मोहम्मद गझनी कडून त्रीलोचनपाल या शेवटच्या हिंदू राजा च्या पराभवानंतर तिथे पुन्हा हिंदू राष्ट्र दत्ताजीराव शिंदेंनी प्रस्थापित केले.
१७६० मधे दिल्ली जवळ भरारी घाट येथे कुतुबशहा कडून दत्ताजी पराभूत झाले. कुतुबशहा ने निर्घृण पणे दत्ताजी यांचा शिरच्छेद केला होता.
शिरच्छेद करण्या आधी कुतुबशहा ने दत्ताजी शिंदे ना विचारले होते "क्यों पाटील और लडेंगे?" यावर दत्ताजी शिंदे यांनी " बचेंगे तो और भी लडेंगे!" असे बाणेदार उत्तर त्याला दिले होते.
३) ज्योतीबा राव शिंदे , सावत्र भाऊ (१७२६-१७६०)
यांनी महादजींच्या साथीने निजामाला हरवले(१७४२) आई मैनाबाई
४) तुकोजी राव, महादजी यांचे सख्खे भाऊ(१७२७-१७६१)
बाबा साहेब उपनाव, (आई चिमा बाई)
तुकोजीराव श्रीगोंद्याचे पाटिल होते. त्यांची
मुले कादरजी राव व आनंद राव.
तुकोजीराव १७६१ तिसऱ्या पानिपतात वीरगती प्राप्त झाले. इथूनच महादजी शिंदेंची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
वेलस्ली ने नेपोलियन ला हरवले पण दौलतराव शिंदें पुढे हरले
तुकोजी रावांचा नातू दौलतराव शिंदे यांस महादजी शिंदे यांनी दत्तक घेतले होते. ज्या ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड आर्थर वेलस्ली ने नेपोलियन बोनापार्ट व लॉर्ड लेक सारख्या जागतिक किर्ती च्या योद्ध्यांना हरवले होते त्या आर्थर वेलस्ली ला मात्र महादजी शिंदे यांचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे यांजकडून युद्धात मात खावी लागली होती.
५) महादजी शिंदे (१७३०-१७९४) ( आई चिमाबाई)
महादजी शिंदे, यांचा जन्म २३ डिसेंबर १७३० रोजी झाला आणि ते १२ फेब्रुवारी १७९४ रोजी पुणे येथे निधन पावले.
महादजी शिंदे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा संक्षिप्त आढावा खालीलप्रमाणे:
कारकीर्दीची सुरूवात १७६१ साली
- १७६१: पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर महादजींची कारकिर्दी सुरू झाली . त्यांनी उत्तर भारतात मराठ्यांचे सामर्थ्य पुन्हा प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावली. यावेळी त्यांचे वय ३१ होते.
राज्याभिषेक
- १७६८: वयाच्या ३८ व्या वर्षी महादजी शिंदे यांचा राज्याभिषेक झाला व ते ग्वाल्हेर चे महाराज झाले आणि १७९४ मध्ये मृत्यूपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली.
शाह आलम ला नामधारी मुघल सम्राट केले
- १७७१: त्यांनी शाह आलम दुसऱ्याला दिल्लीपर्यंत पोहोचवले आणि मुघल साम्राज्य पुनर्स्थापित केले. तसेच, त्यांना 'नाईब (साम्राज्याचे उपराजदूत) हा मान मिळाला. यावेळी महादजींचे वय ४१ वर्षे होते.
जाट व पठाणांचा पराभव केला
- १७७२-७३: त्यांनी मथुरेतील जाट आणि रोहिलखंडातील पठाण रोहिल्यांचा पराभव करून नजीबाबाद जिंकले. वय ४२
वडगाव ला इंग्रजांचा पराभव व तह
- १७७५-१७८२: पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव करून त्यांनी सालबाईच्या तहाची वाटाघाटी केली. या वडगाव च्या लढाईत जर महादजींनी इंग्रजांना हरवले नसते तर याच वेळी भारतातला इंग्रजी सत्तेचा पाया भारतात रोवला गेला असता असे इतिहास तज्ञ मानतात. या पराभवा नंतर इंग्रजांना १८१८ पर्यंत म्हणजे पुढची ४० वर्षे भारतावर भारतात ब्रिटिश झेंडा फडकवण्यासाठी वाट पहावी लागली होती.
वडगाव च्या दीर्घ युद्धाचे वेळी महादजींचे वय ४५ ते ५२ होते
मुघलांनी 'वकील इ मुतलिक' नेमले
- १७८४: त्यांची 'वकील-इ-मुतलक' (मुघल व्यवहारांचे प्रमुख प्रतिनिधी) म्हणून नियुक्ती झाली. वय ५४
राजपूतांकडून पराभव
- १७८७: त्यांनी राजस्थानावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण लालसोट येथे राजपूत सैन्याने त्यांना पराभूत केले. वय ५७
राजपुतांना पराभूत करून बदला घेतला
- १७९०: आपल्या पराभवाचा सूड घेत महादजींनी पाटण आणि मेर्ता येथील लढायांमध्ये जोधपूर व जयपूरच्या राजपूत राज्यांना चिरडून टाकले. आपल्या शेवटच्या काळात " जीवित रहा तो जयपूर को धूल में मिलाकर रहूंगा" अशी महत्वाकांक्षा त्यांनी व्यक्त केली होती . वय वर्षे ६०
शेवट पुण्यात वानवडी येथे
![]() |
महादजी शिंदे यांच्या समाधी स्थळाचा अंतर्गत भाग pic courtesy: Google Maps |
- १७९२: महादजी शिंदे पुण्यात वानवडी येथे आले आणि त्यांच्या जीवनातील शेवटच्या २० महिन्यांत ते इथेच वास्तव्यास होते. इथे राहून त्यांनी तरुण सवाई माधवराव पेशव्यांना मार्गदर्शन केले. वानवडी येथेच त्यांचा मृत्यू झाला. महादजींनी इथे स्वतः बांधलेल्या शिवमंदिरा जवळच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले व त्या स्थळावरच आज त्यांचे 'शिंदे छत्री' हे स्मारक उभे आहे.
![]() |
वानवडी ,पुणे येथील महादजी शिंदे यांच्या समाधी जवळील भव्य स्मारक |
![]() |
वानवडी,पुणे येथील महादजी शिंदे यांचे समाधीस्थळ |
Disclaimer: सदर लेख काही अंशी ( महादजींचा जन्म व वंश संदर्भात ) मौखिक इतिहास व परंपरांना अनुलक्षून लिहिला आहे. तथ्य व लिखिता मधली तफावत जाणकारांकडून निर्देर्शित केली गेल्यास लेखात योग्य ते बदल केले जातील.
हे ही वाचा
0 टिप्पण्या