शनिवार वाडा : एक बख़र
By Avinash Bhanu Asha Ghodke
बख़र साहित्य हे १९व्या शतकातील 'प्रवास वर्णन' प्रकारात मोडणारे वैशिष्ट्यपूर्ण असे साहित्य आहे जे इतिहास संशोधन कार्यास सहाय्यभूत ठरले आहे.
सदर लेख मी बख़र साहित्य शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखात मी माझी शनिवार वाड्याची सफर नमूद केली आहे.
इतिहासा पलिकडे शनिवार वाड्यात कुलुप बंद झालेल्या भावकथेला बख़र लेखन प्रकारातून उजागर करण्याचा छोटासा प्रयत्न आहे.
पुणे मुक्कामी बहुत दिन झाले पण काही केल्या मुशाफिरी घडे ना. आज प्रातः प्रहरी शरदाची कोवळी उन्हे पडली असता शनिवार वाड्यासी जाणे करावे असे चित्त धरिले आणि तैसे केले.
पुणे येथील हवेत अल्हाद फारच . जिवास तोशीश लागणे असे नाहीच. तरीच शाईस्ता तीन वर्षे निवांत लाल महली डेरा करून राहिला असावा ,गर्दनीचे तर्जनींवर निभावेस्तो.
असो. नगर पालिकेच्या कचेरी ठिकाणी सार्वजनिक वाहनाने पाय उतार होवून मुठे वरचा पुल पार करीत तडक शनिवार वाडा गाठिला. अटकेपार झेंडा फडकाविणार्या नानासाहेब पेशवे हुजूरांचे ठाणेच ते. बाजीरावांचे अन्य पुत्र राघोबल्लाळ ची कारस्थानं या वाड्यानी देखिली. पण वाड्यात पाऊल ठेविताच चित्त मस्तानी च्या पाऊल खुणा धुंडाळू लागले.
शनिवार वाडा प्रवेशद्वारावरील शाबूत राहिलेला लाकडी सज्जा |
वाडा तसा नामशेषच म्हणावा. सात मजली वीट-लाकडाचा वाडा अग्नीकुंडात स्वाहा झाला. सन १७३२ म्हणजे मस्तानीस पुणे शहरी डेरेदाखल केल्यानंतर तीन वर्षे काळाने बाजीरावाने हा वाडा बांधुन काढला . छत्रपती शाहूंनी बाजीरावांस वाड्याच्या बांधकामी काळा फत्तर योजू नये असा लखोटा धाडला होता असे कळते. वाड्याचे जोते व तटबंदी तेवढी पाषाणात बांधुन झाली होती ते कारणे आजतागायत शाबूत आहे. भवतालीचा तट व मुख्य दरवाजाच्या वरील देखणा सज्जा आणि वाड्याचे जोते एवढेच काय ते तुर्तास मागे उरले.
शनिवार वाडा प्रवेशद्वाराकडून वर सज्जा कडे जाणारा जिना |
वाड्याच्या जोत्यावर तीन चार पाण्याची हौदी दृष्टीस पडली. ती वाड्याच्या गर्भगृहातील असावीत असा अंदाज . यातील कुठला हौदा मस्तानीच्या वाट्याचा असावा. पेशवीण बाई तैश्या थोर मनाच्या पण वाड्यातील कबील्याने मस्तानीस दुजाभाव केला ऐसे पेशवे दफ्तरीचे लखोटे-कागदे सांगतात पण धर्मकार्यात लीन पेशवीण बाईंनी मस्तानीचा विटाळ वा मनःस्ताप असा मानिला नाही. मस्तानी नंतर पेशवीण बाईंनी तिच्या इवल्या पुत्रास ,शमशेर बहाद्दुरास आपलाच गेलेला जनार्दन मानून कुठल्या हौद्यात न्हावू घातले असेल बरे. मस्तानी कुठे इबादत करीत असेल? आणि कुठे कृष्ण भजनात लीन होत असेल? असो. सात मजली वाड्याची राख ही उडून गेली पण शनिवार वाड्याचे पाषाण जोते बाजीराव मस्तानी आणी पेशवीण बाईंची सात मजली व्यथा तोलून धरून उभे आहे असे मनास भासते
वाड्यातील एका हौदाच्या काठी पडलेले ते नाजुक कोमेजले फूल दृष्टीस पडले आणि पुन्हा मस्तानीची याद ताजा करते झाले ... हे सांगणे न लगे.
शनिवार वाड्यातील पाण्याचा हौद |
0 टिप्पण्या