२००४ किंवा २००५ साल असेल . शिवाजी मंदिर च्या कट्ट्यावर संध्याकाळी जाण व्हायचं . तिथे आनंद शिशुपाल हे माझे दिग्दर्शक मित्र भेटायचे. त्यांच्याच एका फोटो जर्नलिस्ट मित्राने मरीन ड्राईव्ह ला रेल्वे स्टेशनाला अगदी खेटून असलेल्या एका स्पोर्टस क्लब वर होणाऱ्या 'इफ्तार पार्टी' च निमंत्रण दिलं होतं. आम्ही दोघे गेलो . शर्ट नीट इन केलंय का हे चाचपत मी शिशुपाल यांच्याबरोबर गेट मधून आत शिरलो . सी. एम . विलासराव देशमुख येणार होते म्हणून बंदोबस्त कडक होता. आत मोघलाई व्यंजनांचे ठेले लागले होते . मंडप रेशमी पडद्यांनी आणि फुलांनी छान सजवला होता.मी इकडे तिकडे बघत होतो इतक्यात जर्नलिस्ट मित्र ही आम्हाला शोधत आला . म्हणाला लवकर जेवून घ्या नंतर संपलं तर प्रॉब्लेम होईल. सी. एम. आल्यावर त्यांच्या बरोबर फोटो काढून देतो असं ही तो म्हणाला आणि लगबगीत गेला .
आता आम्ही दोघांनी रिकाम्या थाळ्या घेवून नेमका कबाब चा ठेला शोधुन काढला . त्या एकाच ठेल्यावर लोकांची झुंबड लागली होती. आचारी हळू हळू कबाब भाजून , होईल तसे लोकांच्या ताटात टाकत होता . बरीच वाट बघितल्या नंतर आमच्या ताटात हि ते पडले.. भर भर जेवण आटपून घेतले. मांडवाखाली झब्बे टोप्या घातलेल्या मुस्लीम बांधवांचीच गर्दी अधिक होती. बोटांवरचा कबाब चा लाल रंग टिशू पेपर ने पुसत मी मनातल्या मनात 'आपण इथे जरा out sider दिसतोय' असा विचार करत होतो आणि तेवढ्यात सी. एम . पाय उतार झाल्याची कुजबुज ऐकू आली . गर्दी एका दिशेने वाहू लागली..आम्ही ही त्या प्रवाहात स्वतहाला झोकून दिले. थोडे पुढे गेल्यावर पांढऱ्या शुभ्र कापडाने अच्छाद्लेल्या एका सलग लांब टेबला मागे हसत मुख विलासराव विराजमान झालेले दिसले. विलासरावांच्या शेजारी शंकरराव चव्हाण अतिशय गंभीर मुद्रेत पांढरी शुभ्र कडक इस्त्री केलेली टोपी घालून बसले होते . शंकर रावांच्या शेजारी अभिनय सम्राट दिलीप कुमार बसले होते. लोकं पुढे जावून विलासरावांशी हस्तांदोलन करत होते. काही लोक एवढ्या गोंधळात त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेत होते. विलासराव ही दिलखुलास पणे हसून त्यांना प्रतिसाद देत होते. शंकर रावांचं गंभीर व्यक्तिमत्व बघून त्यांच्याशी हस्तांदोलन करायला कुणी हि धजत नव्हत. आम्ही गर्दीतून पुढे सरकत होतो. ते approachable वाटत नव्हते.
एव्हाना आमच्या जर्नलिस्ट मित्रानेही
क्यामेरा सावरत आमचा फोटो घेण्यासाठी आपली जागा निश्चित केली होती. शिशुपाल
अतिश सडपातळ असल्याकारणाने थोडीशी जागा मिळताच सुळकन आत घुसले मी
त्यांच्या मागेच होतो . शिशुपालांनी हात लांब करून विलासरावांशी हस्तांदोलन
केले.विलासराव हि हस्तांदोलन करून हसले .फोटो क्लिक झाला . विलासरावांची
नजर शिशुपालांच्या मागे उभ्या, माझ्याकडे गेली . ते माझ्याकडे ही बघून
तसेच आपुलकीने हसले. कुठली ही ओळख नसताना त्यांनी आपल्या भुवया " काय रे?
इकडे कुठे ?" अशा आविर्भावाने उचलल्या आणि हसले . एवढ्यात गर्दीचा एक
लोंढा मध्ये घुसला . मी मागे फेकला गेलो. अता हस्तांदोलन अशक्य होतं . मी
पुन्हा प्रयत्न केला नाही. विलास रावांची भेट पुन्हा कधी ना कधी होईल असा
विश्वास होता मला.
राजकारणात आदरणीय व्यक्ती खूप आहेत पण दिलखुलास हसणार्या विलासरावांबद्ल प्रेम आणि आपलेपणाचा भाव वाटायचा.आयुष्यात एकदाच मी त्यांना प्रत्यक्ष
बघितलं. ते ही पवित्र रमझान च्या इफ्तार मध्ये. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची
संधी हुकली. फोटो ही राहीला. काही छोट्या छोट्या अपूर्ण इच्छांचा उपवास मानवी जीवनाला असतोच . त्याला इफ्तार नाही .
विलासराव गेले तेंव्हा ही रमझान महिनाच होता . यावेळी रमझान विलासराव देशमुख गेल्याची दु:खद वार्ता घेवून आला होता . विलास राव गेल्याची हळहळ जनमानसात होती. रमजान चा इफ्तार म्हटलं की त्या इफ्तार पार्टी ची हटकून आठवण होते . सर्व काही सुस्पष्ट त्रिमिती स्वरुपात दिसु लागलं आणि
जाणवू लागलं ..असं वाटतय जसा काही मी त्या इफ्तार पार्टीत उभा आहे...मी आजू
बाजूला बघतोय.. मुघलाई पदार्थांचे ठेले ... रेशमी पडदे.. पायघड्या ..
मुख्य द्वारावर तैनात पोलीस कुमक. आत माणसांची झुंबड ... हवेत भरून
राहिलेला कबाब चा वास... त्या वासाने चाळवलेली भूक ..विलास राव आल्याची
कुजबुज (की गेल्याची ??) .. एका दिशेने सरकणारा माणसांचा लोंढा..आणि गर्दीतून माझ्याकडे
बघून दिलखुलास हसणारे विलासराव .. त्यांच्या उंचावलेल्या प्रश्नार्थक
भुवया ... "काय रे ?? इकडे कुठे ??..!!" असं म्हणणाऱ्या.
-अवि
2 टिप्पण्या
खूपखूप छान.....
उत्तर द्याहटवाधन्यवाद:)
उत्तर द्याहटवा